राज्य कारभार…


राजाची राज्य कारभारावरची देखरेख सैल झाली तर राजाच्या देखरेखीखाली राज्य कारभार करणाऱ्या कारभाऱ्यांच्या एकाधिकारशाहीचा स्तोम माजतो. यातून अधिकार अधिक दुणावतो. मग स्वअस्तित्व टिकवण्यासाठी अश्याच भेदयांची साखळी तयार केली जाते. परिणामी राजा नव्हे राज्याचा कारभार कारभारीच करू लागतात..

राजाच्या डोळ्याच्या पलीकडेच पुन्हा प्रकरणांचा निपटारा होऊ लागतो. मग राज्याची ख्यालखुशाली कारभाऱ्याच्या तोंडून ऐकायची सवय राजाला लागते. यातून रयतेचे हाल होतात, त्यांच्याकडे राजाचं दुर्लक्ष होतं, त्यातून असंतोष माजतो मग परिणामी पुढे हळू हळू राजाचं राज्यही लयाला यायला लागतं..

राज्याची घडी विस्कळीत होऊ लागली की राजाचे डोळेही उघडू लागतात, जिकरीचा वक्ताला सोबती असलेले आठवू लागतात पण ते राजाने दुर्लक्षित केल्याने आणि कारभाऱ्यांकडून मनातून दुरावलेले अन् दुखावलेले असतात, मग राजाला कळतं पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय आणि बराच उशीर झालाय..

आणि जेंव्हा सुस्तवाल राजाच्या राज्यात मस्तवाल कारभाऱ्यांचा कारभार वाढला आहे, तेंव्हा प्रजा दुर्लक्षित झाली. मग परिणामी पुढे गर्दन छाटली गेली ती राजाचीच राज्य कारभार करणाऱ्या कारभाऱ्यांची नव्हे.. पण हे सारं घडतं कशाने..? राजाचं राज्यावरचं लक्ष कमी झाल्याने..

इतिहास नेहमीच खूप काही शिकवतो, इतिहास नेहमीच खूप खोलवर अर्थ सांगत असतो, ‘विजयाच्या उन्मादात आणि पराभवाच्या निराशेत बऱ्याचदा चुकीच्या व्यक्तीचे उदात्तीकरण होते, हा इतिहास आहे. आणि त्या व्यक्तीचे स्तोम माजल्यानेच पुढचा इतिहासही ‘बि’घडवतो..

हे सारं टाळण्यासाठी राज्याची सूत्रे राजाच्या हातात आणि राजाची राज्यावर अन् राज्य कारभारावर करडी नजर असावी लागते, तरंच परिणामी पुढे राज्याचा गाडा सुस्थितीत आणि व्यवस्थित चालतो नाहीतर ‘कोणतीही सत्ता उन्मत झाली की तिचा नाश होणं हा अटळ असतो’ हा इतिहास आहे !

#कथा_ऐतिहासिक_काल्पनिक

©रामदास कराड

…..मग आपला डावा हात मिशांवर नेत आझादांनी मिशांवर ताव मारला !

चित्रांशी आठवणी जुडलेल्या असतात. काळ कितीही पुढे वाहिला तरी त्याला आठवणीत बांधून ठेवण्याचं कसब माञ छायाचित्रात आहे. छायाचित्र आठवणी असतात. निघून गेलेल्या क्षणांची साक्ष असतात. अनेकांची छायाचित्रे आजही कित्येकांनी जपून ठेवली आहेत. आठवणी म्हणून.

कित्येक जुन्या – पुराण्या तसबिरी तर आजही इतिहासाची अन् त्यातील रोमहर्षक प्रसंगांची आठवण करून देतात. आपल्या आयुष्याला आकार देण्यासाठी येणाऱ्या भावी पिढ्यांना मार्गदर्शक, स्फूर्ती, प्रेरणा देणाऱ्या त्या स्मृतींची आजही कायमच दखल घ्यावी लागतेच हे विशेष !

क्रांतीचा किस्सा व्यक्त करावा म्हणून बऱ्याच दिवसांनी या आवडीच्या विषयावर थोडा आज लिहता झालो. आपल्या पिळदार शरिरष्टीवर शोभणार्या आणि पाहणाऱ्याला रुबाबदार वाटणाऱ्या चेहऱ्यावर उठून दिसणाऱ्या मिशांवर ताव मारलेलं छायाचित्र दृष्टीस पडलं आणि त्यांच्या चित्राशी संबंधित असणारी पुस्तकांत वाचलेली एक आठवण मनात ताजी झाली.

अगदी लहान वयात भोगाव्या लागणारे कष्ट, हालअपेष्टांशी केलेला सामना यांत त्यांच्या मनाची सिद्धाता किती थोर होती, याचा प्रत्यय आझादांच्या व्यक्तीमत्वातुन आल्या शिवाय राहत नाही. गुलामगिरीच्या जोखडातून देशाला मुक्त करण्याच्या उलाढाली चालू असताना क्रांतिकारकांचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या एका अद्वितीय महापुरुषाचा जीवनक्रम अनेक घटनांनी भारलेला आणि भरलेला होता. त्या प्रख्यात पुरुषाचे नाव चंद्रशेखर आझाद !

पोटाची खळगी भरण्यासाठी ही क्रांतीची उलाढाल नव्हती तर किमान येणाऱ्या पिढ्यांच्या भाग्यात तरी स्वातंत्र्याची सुंदर पहाट पाहायला असावी हा अट्टाहास होता. ही क्रांतीची कहाणी मोठी रंजक आहे, अनेक हस्यांचे फवारे यात आहेत, दिलदार मैत्रीचे किस्से तर अफाट आहेत तसेच दुःख, दुरावा, संकट, यातनांचे अघटित अनुभवही फार आहेत. क्रांतीची वाटच तशी काटेरी होती.

मास्टर रुद्रनारायण सरस्वती पाठशाळेत चित्रकलेचे शिक्षक होते. ते उत्तम छायाचित्रकार आणि मूर्तिकारही होते पण त्याच बरोबर डबलबार, कुस्ती, मलखांब सारख्या शारीरिक व्यायामाचं कसबही त्यांच्या अंगी आगदी ठासून भरलेलं होतं. काकोरी कटानंतर फरारीत १९२६ मध्ये आझाद झांशीला आले होते. त्यावेळी ते मास्टर रुद्रनारायण यांच्याकडेच राहू लागले. आझाद झांशीत नाव आणि पेशा बदलून राहत असत. तिथं त्यांचं नाव हरीशंकर आणि पेशा मोटर मेकॅनिक असा होता. रुद्रनारायण स्वतः राष्ट्रीय आंदोलनात तुरुंगवास भोगून आलेले, चळवळीतलेच सहकारी.

बहुतेक क्रांतिकारक आपले छायाचित्र कुणाला काढू देत नसत. त्याचं कारण असं की पोलिसांना ओळख पटविण्यासाठी ते चित्र पुढे उपयोगी पडण्याचा दाट संभव असे. आझादांचाही तोच कटाक्ष होता. पण प्रभाव पाडणाऱ्या आझादांच्या व्यक्तिमत्त्वाने रुद्रनारायण यांच्याशी प्रेमाचे संबंध प्रस्थापित झालेले, त्या दोघांची चांगली गट्टीच जमली होती.

एकवेळ त्यांच्याकडे अंघोळ आटोपून आझाद बाहेर आले, तेंव्हा रुद्रनारायण हातात कॅमेरा घेऊन उभे होते. ते आझादांना म्हणाले, अरे, आज तू तुझा फोटो मला काढू दे ना..? अत्यंत बेसावध आसवस्थेत आझादांनी हो भरलं. पण ते पुढे रुद्रनारायण यांना म्हणाले की मला माझ्या मिशा तरी नीट करू द्या, मग आपला डावा हात मिशांवर नेत आझादांनी मिशांवर ताव मारला, तोच दुसऱ्याच क्षणी रुद्रनारायण यांनी ते भारदस्त व्यक्तीचं चित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं.

( टीप – सदरील छायाचित्रामुळे ही गोष्ट आठवली. मूळ छायाचित्र हे नाही ! )

पुढे कानपुरला गेल्यानंतर त्या चित्राची आझादांना आठवण झाली. त्यावेळी तेथील सहकारी विश्वनाथ वैशंपायनांना सांगितले, की रुद्रनारायण यांच्याकडे जाऊन ते काचेच्या फ्रेममध्ये लावलेलं चित्र फोडून, फाडून टाक. वैशंपायन त्यासाठी तिथं गेले देखील पण रुद्रनारायण म्हणाले की तुमच्यासमोर ते चित्र मी भिंतीत लिपुन टाकतो, तुम्ही आझादांना जाऊन सांगा की चित्र नाहीसं केलं आहे, म्हणजे तुम्ही त्यांची आज्ञा पाळली असं होईल. हे चित्र आपण आठवण म्हणून ठेवू नाहीतर यांच्यासाठी आपण पुढे कधी रडत बसू !

विश्वनाथ वैशंपायन यांना रुद्रनारायण म्हणाले ती गोष्ट पटली होती. कारण त्या माघे इतिहासावरील दृष्टीला दिलेली धीटसाथ होती. मास्टर रुद्रनारायण आणि वैशंपायन यांची दूरदृष्टी होती. भावी काळासाठी ही चित्र सुरक्षित राहिली पाहिजेत हा विचार त्या माघे होता. येणाऱ्या पिढ्यांना क्रांतीची प्रेरणा देणारं ते छायाचित्र होतं. क्रांतीच्या खाणा-खुणा सांगणाऱ्या एका विराची ती एक स्मृती होती. ज्या जिवाच्या जोखमेनं मास्टर रुद्रनारायण आणि वैशंपायन सारख्यांनी सांभाळली आणि आज आपल्या पर्यंत पोहचती केली. ज्यांना पाहून आपण आज प्रेरणा, स्फूर्ती घेतो. त्यांच्या त्या छायाचित्राचा असाही एक इतिहास आहे. तो आज त्यांच्या स्मृतीदिनी आठवला म्हणून शब्दांतुन आझादांना नमन करीत लिहीता झालो.

आझादांचं व्यक्तिमत्व शब्दांत अधोरेखित करणं कठीण. पण हा मनात उसळलेला क्रांतिकल्लोळ इथं रेखाटण्याचा एकमेव हेतू हाच की आझादांसारख्या आणि अश्याच अलौकिक पुरुषांच्या खांद्यावरच त्यावेळच्या हिंदुस्थानची, आजच्या भारताची कमान दिमाखात खडी होती. जी आजही आहे.

क्रांतीच्या लढ्यात सामील असलेल्या अनेक वीरपुरुषांची एक माळ होती. हिंदुस्तानच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत एकसंघ पसरलेली. अनेक सहकारी साथीदार या लढयात सहवासात सोबती झालेले सहकारी मिञ होते. हिंदुस्थानातील प्रत्येक राज्याच्या माती – माणसाशी संबंध आलेली ही माणसं आपल्या मातीच्या – महतीसाठी छातीला माती लावून शेवटपर्यंत अविरत लढत राहिले. होयऽऽ शेवटच्या श्वासापर्यंत.. आयुष्याच्या अखेरपर्यंत..

जब तक जिया तब तक मुछोंपें ताव था..
गुलाम देश मे वो इकलौता आझाद था..

  • संदर्भ – वडवानल – लेखक वि.श्री.जोशी

राष्ट्रप्रथम 🇮🇳

आझाद

इंकलाब_जिंदाबाद

© रामदास कराड

‘तो प्रेमात पडलाय तिच्या…

निद्रेचा अन् त्याचा अश्यात सावतासुभा चाललेला. अनेकदा कूस बदलूनही त्याचे प्रयत्न निष्फळ ठरायचे. मनाला लागलेली हुरहूर निद्रेशी जवळीक होऊ देत नव्हती. कितीतरी रात्री त्याने या काळात जागून काढलेल्या. त्याचं मन कशातच रमत नव्हतं. लोकांच्या गर्दीत असूनही तो एकटाच हरवलेला होता.

नेहमी उशिरा झोपून उशिराच जागणारा तो सुर्योदय होण्याआधीच आता जागा व्हायचा. अपरात्रीपर्यंत जागलेले त्याचे डोळे, पहाटे लवकर जागे झालेले भाव त्याच्या चिंताक्रांत डोळ्यातून चेहऱ्यावर उमटलेले स्पष्ट दिसायचे. नेहमी हस्यकल्लोळात सामील असणारा तो एकटाच एकांतात असायचा.

आजवर आपल्या कोषात जगलेला, स्वतःच्या कुंपणाबाहेर याआधी तो कधीही नव्हता गेला. आयुष्यातील अनेक निर्णयाचे पावलं त्याने विचारपूर्वकच टाकलेले. हा नवा नियतीचा खेळ त्याला निराळा होता. कधीच कुठेच न गुंतलेला तो इथं मात्र मनातून गुंतला होता.

तिच्या आठवणीने तो मनातून व्याकुळ झालेला. राहून राहून भिंती अडून तिने त्याच्याकडे पाहून टाकलेला एक चोरटा कटाक्ष त्याच्या व्याकुळतेत अधिक भर घालत होता. तिच्या नजरेनं केलेला घाव पार आरपार त्याच्या मनात झाला होता. नेहमी तिचा तो निरागस, निष्पाप, निर्मळ चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येऊन उभा राहायचा.

तो तिच्या एका नजरेनं घायाळ झाला होता.. तो प्रेमात पडलाय तिच्या..

© रामदास कराड

दिवस मंतरलेले….

मनात आठवणींचा आज पसारा आहे. आज सहज आपल्या शाळेकडे जाणं झालं. शाळेसमोर काही काळ थांबलो देखील. शाळेच्या भिंतीवरचा रंग पार उडालेला दिसला. पहावं असं नव्हतं वाटत आज शाळेकडे. किती काळ लोटून गेलाय नाही. शाळा सोडून. शाळा किती गजबलेली असायची आपल्यावेळी. आज पार पोरकी झाल्यासारखीच भासली बिचारी.

शाळेच्या त्या मोकळ्या प्रांगणात एका रांगेत आपण झाडं लावली होती. वेगवेगळी. तेवढीच माञ आज तग धरून दिसली, हिरवीगार, गजबजलेली, पानाफुलांनी लगडलेली. तुला आठवतंय..? तू मुद्दाम वृक्षारोपणाचा आग्रह केला होतास त्यावेळी. आज ती बहरलेली झाडं पाहून तुझी आठवण मनात फार आली.

आपण शाळा सोडून जाऊ त्यावेळी आपली आठवण म्हणून आपण या शाळेत काहीतरी मागे ठेवून जाऊ, म्हणून त्या झाडांचा तुझा आग्रह होता. आपण उद्या इथं नसू पण ही झाडं, आपण इथं वाढलो, शिकलो, वावरलो, खूप खेळलो, बागडलो, अनेकदा चुकलोही आणि सावरलो देखील इथंच याची कायम साक्ष देत राहतील, असं तू त्यावेळी म्हणाली होतीस.

त्या झाडांच्या सावलीला आज अनेकजण विसावतात, आस – पास राहणाऱ्या अनेक लोकांची तिथं वर्दळ असते. लहानमुले त्या झाडांच्या सावलीला नेहमी खेळतात, ती तू प्रेमाने लावलेल्या झाडांबद्दल तुझी किती दूरदृष्टी होती हे आजचं दृष्य पाहून खरं वाटतंय. झाडांसाठीचा तुझा आग्रह खरंच किती खरा होता याची आज जाणीव होतेय.

शाळा सोडून खूप काळ झालाय आपल्याला. आपण मोठे झालो, वाढलो. आपापल्या मार्गाने पुढे गेलो. ती झाडंही आता फार मोठी झाली आहेत. पार उंच झाली आहेत, डेरेदार झाली आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत थंडगार सावली देतील इतके विशाल वाढली आहेत, तू लावलेली झाडं. आपण आज शाळेत नाही आहोत. पण ती झाडं तिथं शिकणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी आश्रय देतात. आजही.

पण एक तुला सांगू..? तो झाडांचा सळसळणारा आवाज आज मला काही सांगत होता. काही प्रश्नही कदाचित तो विचारत होता. खूप दिवस झाले त्यांना तू पाहायला आलीच नाहीस. त्यांना पाहायला येऽऽ.. त्यांना बोलायला येऽऽ.. त्यांच्या मनात आनादी काळापासून काही निरुत्तरीत प्रश्न आहेत ते ऐकून घ्यायला येऽऽ..

मी खूप प्रयत्न केला गं.. त्यांना विचारण्याचा. माझ्या जवळ तुझ्या बद्दल बोलतं करण्याचा. पण तू प्रेमाने लावलेल्या त्या झाडांचा फक्त तुझ्या जवळच व्यक्त होण्याचा हट्ट आहे, ती झाडं तुझी वाट पाहतायत. आजही. अगदी चातकासारखी.. होयऽऽ अगदी माझ्यासारखीच.. किमान त्या झाडांचा प्रेमाचा हट्ट पुरवण्यासाठी तरी येऽऽ..

© रामदास कराड

महाविद्यालयीन जीवन…

महाविद्यालयीन जीवनात असताना आम्ही जिल्ह्यातल्या राजकारणावर बोलायचो. या त्या नेत्यांवर, स्थानिकच्या विषयवार उगाच बडबडायचो. अर्थहीन चर्चा असायच्या त्या. आज पुण्यात आजची विद्यार्थी मिञ #JNU दिल्ली आणि चालू घडामोडींवर बोलताना, मतं व्यक्त करताना दिसतात

ते पाहिलं की वाटतं, आपण खरंच कधी काळी म्हणजे अगदी महत्वाच्या वेळी किती मागे, आणि अप्रगत होतो, याची जाणीव होते. गाव खेड्यातून मोठ्या शहरात आल्यावर विचार मोठे होतात. नवं-जुनं कळतं, पाहायला मिळतं, स्वप्न मोठी होतात, व्यक्तिमत्वाला आकार येतो, नवे बदल होतात.

मोठ्या शहरातल्या या वातावरणात त्या विद्यार्थी मित्रांच्या गप्पा-गोष्टी ऐकल्या की आजही वाटतं, या मुलांमध्ये जी समज आज आहे, ती त्यावेळी, त्या वयात आपल्यात नव्हती. आपण आजही खूप मागे आहोत. घोळक्या घोळक्यांनी बसलेला मुला-मुलींचा चर्चेचा कट्टा पाहिला,

की वाटतं आपण महाविद्यालयात फक्त नावाला शिकलोय. या नव्या जुन्या गोष्टींचा, मोठ्या शहरात वावरण्याचा, शिकण्याचा गधंच आपल्याला नाही अनुभवता आला कधी. आपला चांगला असो वा वाईट पण तो वैचारिक विकास, ती बैठक अनुभववायची राहूनच गेली.

ओंकारेश्वर मंदिर जवळील ब्रिजवरून रात्रीच्या कुशीत विसावलेलं पुणं !

आजही त्या मोठ्या शहरातल्या, त्या मोठ्या महाविद्यालयात परत जावं वाटतं, तिथं जाऊन शिकावं वाटतं, उठावं, बसावं, तिथलं वातावरण अनुभवावं वाटतं. पण ते आता शक्य नाही. काळ फार पुढे वाहून गेलाय. अन् मी देखील आता काळाच्या फार पुढे निघून आलोय.

मनात आयुष्यभर एक रुखरुख कायम राहणार आहे ; ती याच गोष्टीची की, महाविद्यालयीन जीवन आपल्याला अनुभवता आलं नाही. वेळ होती, काळ होता. पण ती मज्जा – मस्ती आपल्या वाट्याला आलीच नाही.

शेवटी आयुष्य पुढे निघून जातं, काळ माणसाला पुढे वाहून नेतो. पण खंत माञ उरात कायम राहून जाते. ती आपण ते जीवन न जगल्याची !

~ रामदास कराड

….अन् दगडांची फुलं झाली !

आठवतोय मला, तो साल २०१५ चा, तो दिवस. केवळ निर्मळ श्रद्धेपोटी भगवानबाबांच्या समाधी समोर नतमस्तक होण्यासाठी आम्ही गडावर गेलेलो. काहीही दोष नसताना त्यावेळी काही समाजकंटक हातांनी साहेबांच्या गाडीवर दगडं मारली. पण मनात निखळ श्रद्धा होती.

ती बाबांप्रती. बाबांच्या गादीप्रती. जी श्रद्धा कधी तसूभरही कमी झाली नाही, ना तो विचार कधी ढळू दिला. साहेब लढत होते, एकाकी. बाबांचा आशीर्वाद मोठा ! बाबांच्या गादीचा मान मोठा ! हे मानून त्या श्रद्धेपोटी साहेब गडाचा भक्त, गडाचा पाईक म्हणून गडावर आलेले होते.

राष्ट्रसंत श्री.भगवानबाबा सानप यांच्या भगवानगड येथील समाधीस्थळी सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. धनंजयजी मुंडे साहेब दर्शन घेताना !

कारण नसताना समाजाने दूर लोटलं, पण सामान्य माणसासाठी संघर्ष करण्याची वाट साहेबांनी कधी सोडली नाही. संघर्ष तर साहेबांचा खरा सखा-सोबती. समाजात वावरत असताना लोकं जळजळीत नजरेने साहेबांना पहायचे. कित्येक वेळेस नावाचा उपमर्द करायचे. त्यावेळी जाणून बुजून काही लोकांनी समाजात ‘खलनायक’ ही उपमा बहाल केली.

पण भगवानबाबांचा आशीर्वाद पाठीशी कायम होता. साहेब चालत होते, सामान्य माणसासाठी लढत होते. अखंड.. अविरत.. होयऽऽऽ अविश्रांत.. साहेब कष्ट उपसत राहिले. वेळ लागला, संघर्ष आणि साहेब हे तर समीकरणच झालेलं. शेवटी सत्याला परीक्षा द्यावी लागते. त्याला आमचे साहेब तरी कसे अपवाद असतील..? साहेबांना तर अग्निपरीक्षा द्यावी लागली.

हळू हळू काळ बदलत गेला, सत्य – असत्याच्या लढाईत समाजाने, सामान्य माणसाने सत्याला ओळखलं आणि परळीच्या मायबाप जनतेनं सत्याला खरा न्याय दिला. गडाचे मठाधिपती शास्त्री महाराजांनी आज्ञा केली, ‘आशीर्वाद घेण्यासाठी गडावर याऽऽऽ..’ हा बाबांवरील श्रद्धेचा चमत्कार होता. अतूट श्रद्धा होती.

साहेब राज्याचे सामाजिक न्याय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आज नारायणगड, गहिनीनाथगडाचे दर्शन घेऊन भगवानबाबांच्या समाधी समोर नतमस्तक होण्यासाठी भगवानगडावर आले, आजचं चिञ माञ वेगळं भासलं.

सारा परिसर त्याच माणसांच्या गर्दीने फुलून गेला होता. सारा भगवानगड परगणा आपल्या लेकाच्या कौतुकाला गडावर गोळा झाला होता. आज सारा गड स्वागताला सज्ज होता. कधी काळी ज्या हातात दगडं होती, त्या हातात आज फुलांच्या माळा घेऊन लोकांचा मेळा गडावर जमला होता.

हे सारं आगळं वेगळं चिञ पाहून डोळ्यासमोर आजवरचा प्रवास लख्खं खडा राहिला. सारं काही एकदम आठवलं.

खलनायक ते नायक होण्याचा आजपर्यंतचा साहेबांचा सफर सोप्पा माञ अजिबात नव्हता. ज्यांनी नाकारलं, त्यांनी आज स्वीकारलं, जळजळीत नजरा अनुभवलेल्या डोळ्यातून किती कौतुक आणि किती कुतूहल ओसंडून आज वाहत होतं, ते चेहऱ्यावरील भाव पाहून जाणवत होतं.

आजचा हा दिवस पाहण्यासाठी कितीतरी साहेबांनी भोगलं होतं. मनात प्रचंड मोठी समाधानाच्या भावनेनं दाटी केलेली असताना, ते सारे दृष्य शब्दांत रंगवायला शब्द माञ आज अपुरे आहेत. राहून राहून एक विचार माञ मनात माझ्या घर करून कायम राहिला आहे,

‘दगडांची फुलं झाली पण दगडांची फुलं करायला ‘धनंजय मुंडे’ च व्हावं लागतं !’

#DMनायक
#संघर्षयोद्धा

~ रामदास कराड

‘गारवाऽऽ…

थंडीचेच दिवस ! बाहेर मंद वारं वहात होतं. वाऱ्याच्या एका झोतासरशी आलेली थंड वाऱ्याची एक झुळूक अंगाला बिलगून गेली.

वाहणारं गार वारं वातावरणात गारठा पसरवत होतं. गार वाऱ्याच्या झुळकीने क्षणभर त्याच्या अंगात कापरं भरलेलं.

शेवटचं पान वाचून झालं आणि त्याने समोर पाहिलं. हलक्याश्या झुळकीने पुस्तकाच्या पानांवर हेलकावणारं चांदणं खिडकीतून आत डोकावत होतं.

दाट धुक्याची चादर पसरवू पाहणाऱ्या थंडीधुक्याला न जुमानता लुकलूकणारं चांदणं आकाशात फैलावर पसरलं होत.

‘तो’ स्वतःशीच हसला अन् परत एक गार वाऱ्याची झुळूक येऊन त्याच्या अंगाला बिलगली.

~ रामदास कराड 📚