“ मास्तर – आयकताय ना….”

माफ करा मास्तर.. शिक्षक दिनाच्या पुर्वसंध्येला तुम्हाला शुभेच्छा देतोय.. कसंय न मास्तर.. काही गोष्टींचं महत्व कळायला जरा उशीरच झाला, काही म्हणण्यापेक्षा बऱ्याच गोष्टींची माहिती जरा उशीरानंच झाली मास्तर.. शाळा, महाविद्यालयात आम्ही शैक्षणिक आयुष्य जगत असताना दिवस आणि दिनविषेशांचं आणि शिक्षणाचं महत्व तुम्ही सांगत, शिकवत, पटवून देत असताना भविष्याकडे गांभीर्याने पाहण्याची दिव्यदृष्टीचं त्यावेळी नसल्याने कधी त्या गोष्टी, विषयाचं महत्वच वाटलं नाही मास्तर.. पण खरं सांगू मास्तर.. तुमचं सांगणं, बोलणं, रागावणे शिक्षा करणं किती योग्य होतं याची जाणीव खूप उशिरा होतं आहे मास्तर.. याचं वाईटही वाटतं मास्तर.. तुमच्या उजव्या हाथातील खडूची, डाव्या हाथातील पुस्तकाची आणि महत्वाचं म्हणजे बेंचवर ठेवलेल्या तुमच्या सडपातळ पण काटक छडीची आजचं वास्तविक जिवन जगताना प्रकर्षानं आठवण होतं आहे मास्तर.. कारण की शाळेतील शिक्षेपेक्षा वास्तविक आयुष्यातील चटके खूप दाहक असतात..

मास्तर काळ बदलला तसे शाळेतील काळे बोर्डही पांढरे झाले, शाळेतील काळ्या बोर्डावर लिहून आमचं भविष्य पांढर करण्यासाठी तुमचे हाथ तर पांढरे व्हायचेच आणि खडूही शिल्लकीत राहत नसतं पण मास्तर.. आत्ता तेही काळानुरूप बदललं आहे बोर्ड पांढरा आणि पेन काळा झाला आहे खडू तर कुठेतरी तुरळक दिसतो मास्तर.. योग्य वेळी योग्य शिक्षा हा सुध्दा शिक्षणातला भाग असतो तसेच शिक्षकांबद्दल प्रेमाबरोबर धाकही असतो त्या शिक्षेच्या धाकाची छडी आज शाळा, महाविद्यालयातुन विध्यार्थ्यांचं समृध्द भविष्य घडवण्यासाठी सावध करणारी तुमची छडी कालौघात हरवली आहे मास्तर..

आम्ही शाळेत चिखलाचा गोळाच होतो पण तुम्ही कुंभारा प्रमाणे मार्गदर्शक विचारातून आमच्या आयुष्याला पैलू पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलात मास्तर.. मुलांना शिस्त लावताना आपल्या चारित्र्याकडे लक्ष असायचे कारण वागण्या, बोलण्यात शब्दात ‘चारित्र्य’ नसेल तर धाक निर्माण होत नाही, आचरण घरात आई वडिलांच्या कडून आणि शाळा, महाविद्यालयात मास्तर तुम्ही कसं वावरता यातूनच आम्ही मुलं शिकत होतो कारण तुम्हीच त्यावेळी आमचे आदर्शच होता, ‘अधिकार’ पदात तेव्हाच येतो जेव्हा तो स्वत:च्या आचरणात असतो असं तुम्हीच आम्हाला सांगत होता ना मास्तर.. पण खरं सांगू मास्तर.. काही बोटांवर मोजले जाणारे आठवणीतले शिक्षक सोडले तर प्रामाणिक, कर्तव्यदक्ष शिक्षकांची सध्या वाणवा झाली आहे..

तुम्ही कर्तव्य करत असताना कठोर होत शिक्षा करत होता त्या शिक्षेतही वात्सल्य लपलेलं असायचं मास्तर.. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य त्यांची परीक्षा फिसही भरणारे शिक्षक मी पाहिले आहेत मास्तर.. पण हेही सध्या दुर्मिळ झालं आहे, आज घरचा अमाप पैसा असलेली मुलं शिक्षणाच्या नावाखाली मौज, मजा, मस्ती करतायेत आणि ज्याच्याकडे पैसे नाहीत, असे निमूटपणे शिक्षण सोडून गप्प आहेत. शिक्षणापासून वंचित असलेल्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे या भयानकरित्या बदलत चाललेली परिस्थिती हाताळण्यासाठी तुमच्या त्या, प्रमाणिक, प्रेमळ, सजग हाथांची, त्या पांढऱ्या खडूची, त्या काळ्या बोर्डाची, त्या पुस्तकाची आणि तुमच्या मार्गदर्शक तत्वांची आणि विशेषतः मास्तर.. उद्या देशाचं भविष्य असणाऱ्या मुलांना देशाचे पूर्व राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा शिक्षक ते राष्ट्रपती असा प्रवास, देशात पहिली मुलींची शाळा काढणाऱ्या सावित्रीबाई फुले अश्या अनेक पुरुष, महापुरुषांचा अजरामर इतिहास पुन्हा एकदा सांगण्यासाठी या सर्व बाबींचं महत्व शिकवण्यासाठी खऱ्या अर्थानं तुमच्या त्या “छडीचीच” खरी गरज आहे मास्तर…

माफ करा मास्तर.. खुप बोललो, खुप अपेक्षाही केल्या कारण “देखणे ते हाथ ज्यांना निर्मितीचे डोहाळे” सर्व काही तुमच्याच हाथी आहे मास्तर… शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मास्तर…

© रामदास कराड 😊

5 thoughts on ““ मास्तर – आयकताय ना….””

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: