शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते, सर्जनशीलतेने प्रगल्भ विचार येतात, विचाराने ज्ञान वाढते आणि ज्ञानाने माणूस महान बनतो – APJ Abdul Kalam
———————————————-
जनतेचे राष्ट्रपती (People’s President) अशी ख्याती हयातभर ज्यांना चिटकुन होती आणि त्यांच्या नंतरही प्रेरणादायी विचारांतुन त्यांचा लौकीक टिकून आहे, असे मिसाईल मॅन, भारतरत्न, डॉ.एपीजे अब्दुल कलाम (अबुल पाकिर जैनूलाब्दीन अब्दुल कलाम) १५ ऑक्टोबर हा कलाम सरांचा जन्मदिवस आज वाचन प्रेरणादिन म्हणून साजरा केला जातो, कलाम सरांचा युवक व लहान मुलांवर इतका प्रभाव होता की त्यांना दोन वेळा Youth I Con म्हणून घोषित केलं होतं ते खरंही आहे, कलाम सर आजही आम्हा युवकांचे प्रेरणास्रोत आहेत, यथा तथा परिस्थिती असलेल्या एका साधारण कुटुंबात १५ ऑक्टोबर १९३१ ला धनुषकोडी (रामेश्वरम, तमिलनाडु) येथे जन्मलेले कलाम सर असाधारण प्रतिभेचे मालक होते, मेहनत, बुद्धीमत्ता, विज्ञानाच्या सखोल अभ्यासाच्या जोरावर अशक्य काहीच नाही हे वचन सार्थ ठरवत, सामान्य व्यक्ती ते देशाचे राष्ट्रपती अश्या सर्वोच्च पदापर्यंत पोहचण्याचा कलामांचा प्रवास अगदी वाखण्याजोगा आहे, कलामांचं व्यक्तिमत्त्व तरुणांना लाजवणारं तर होतंच पण ते हर्षोउल्हासित करणारं होतं, कलाम सर सकाळी ४ वाजता उठून गणिताच्या ट्विशनला जात असत तेंव्हा ते ८ वर्षाचे होते, सकाळी लवकर उठण्याची सवय पुढे शेवटपर्यंत त्यांनी कायम ठेवली, ते सकाळी उठून वाचन आणि लिखाण करत असत, ते एकदम शिस्तप्रिय होते, राष्ट्रपती पदावर असताना देखील पुढील ६ महिन्याचे कार्यक्रम दिनक्रमासहित त्यांच्या डायरीत लिहून ठेवलेले असतं, कलाम सर वेळचे जितके पक्के होते त्याहूनही अधिक ते मनाचे सच्चे होते, कलाम सरांनी एका कार्यक्रमात त्यांच्या जिवनातील खंत, यश आणि अपयश काय आहे हे सांगितलं होतं तो एक प्रसंग इथं अधोरेखित करतोय..
मुंबईत एका महाविद्यालयीन कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशीं हित-गुज करत होते, विद्यार्थी मित्रांशी संवाद साधताना एका युवकाने त्यांना प्रश्न विचारला “सर” तुम्हाला इतकं यश मिळालं आहे, पण तुम्ही म्हणता की अपयशातून शिकून मी यश मिळवलं आहे, कधी तुम्हाला असं वाटतं का..? की तुम्ही अपयशी ठरला आहात किंवा जे तुम्ही करू शकला नाहीत त्याबद्दल तुम्हीला खंत वाटते..? डॉ.कलाम विचारमग्न होत व्यक्त होऊ लागले, ते म्हणाले, आज माझ्या घरी माझे ९८ वर्षाचे एक मोठे भाऊ आहेत, ते हळू हळू चालतात त्यांना खूप कमी प्रमाणात दिसतं, त्यामुळं कायमच घरात प्रकाश ठेवावा लागतो, आमच्या रामेश्वरम मध्ये वीज जात, येत असते, त्यामुळं घरात त्यांना इकडे-तिकडे फिरण्याची अडचण होते, म्हणून मी माघच्या वर्षी घरी एक सोलार पैनल बसवला आहे, दिवसा सूर्यप्रकाशने तो सोलार चार्ज होतो त्यामुळं रात्री घरात कायमच वीज पुरवठा नियमित राहतो, आता माझा भाऊ खुश आहे, जेव्हा मी माझ्या भावाला आनंदात पहातो तेंव्हा माझं मन आनंदाने भरून येतं, हे माझं यश आहे असं मला वाटतं…
पण त्याच वेळी मी माझ्या आई-वडिलांच्या आठवणीने गहिवरून जातो, वडील १०३ तर आई ९६ वर्ष जगली त्यांनाही त्यांच्या शेवटच्या वेळेत डोळ्यांनी दिसत नव्हते, त्या काळात तर वीज खूप वेळा जात असे, तेंव्हा असं सोलार वगैरे काहीच नव्हतं, तेव्हा मी माझ्या आई-वडिलांची अडचण दूर करण्यासाठी काहीच करू शकलो नाही, हीच खंत वेदने प्रमाणे आयुष्यभर माझ्या सोबत आहे, माझ्या जीवनातलं सर्वात मोठं हेच अपयश आहे हे सांगताना कलाम सर भावविवश झाले होते, तेंव्हा सर्व हॉल माञ विचारात पडला होता, एवढा मोठा माणूस असूनही पदाचा, सत्तेचा कसलाही फायदा त्यांनी स्वतःला अथवा आपल्या कुटुंबियांनसाठी घेतला नाही, शेवटपर्यंत देशप्रेम, देशहीत त्यांचा धर्म बनून राहिला यातच कलामांच मोठेपण दिसून येत, किती निखळ, प्रांजळ व स्वच्छ त्यांचं मन होतं आणि कर्तव्य न करू शकल्याची खंत देखील अजूनही त्यांच्या मनात होती, कलाम सर असे होते, असे त्यांचे विचार होते म्हणूनच ते असतानाही गौरविले गेले आणि नसतानाही ते त्यांच्या उच्च, आदर्शवादी विचाररुपी तेजातून अजूनही आपल्यात जिवंत आहेत..
शाळेत वर्गातल्या शेवटच्या बाकावर बसलेले कलाम असतील, कोणी सकाळी पेपर वाटत शिक्षण घेत असेल तेही कलाम असतील, पुस्तके कलामांचे मिञ होते पुस्तकं वाचनात आकंठ बुडालेले कलाम असतील, कोणी गीता आणि कुराण एकत्र पठण करीत असेल तिथंही कलाम असतील, कोणी संगीताची आवड जोपासत असेल कलाम तिथंही असतील, खचलेल्या मनाला अग्नीपंख देत, स्वप्न पाहायला लावत असतील कलाम तिथंही असतील, कोणी चुकलेल्याला मार्ग दाखवत असेल तिथंही कलाम असतील, कोठे विज्ञानाचा प्रयोग करत असलेले कलाम असतील, कोणीतरी नाविन्याचा शोध घेत असेल तिथंही कलाम असतील, कुणी एखादं मिसाईल तयार करत असेल ते कलाम असतील, कोणी विद्यार्थी, युवक, बालकांना प्रेरणा देत प्रेरित करत असेल तिथंही कलाम असतील, कलाम सर आजही जिवंत आहेत, आमच्या आचारात, विचारांत, आदर्शात, दिलेल्या धड्यात, शिकवलेल्या तत्वज्ञानात आणि त्यांनी लिहलेल्या सर्वांगसुंदर प्रेरणादायी “विंग्स ऑफ फायर, इग्नाइटेड माइंड्स, इंडिया 2020” यांसारख्या प्रसिद्ध पुस्तकांत जे की तरुणमित्रांना प्रेरणा देत जागृत करत आहेत, त्यांनी केलेल्या प्रत्येक कार्यातून ते आम्हाला आजही मार्गदर्शन करतात म्हणून कलाम अजूनही आजही जिवंत आहेत.. !!
———————————————-
कलामांच्या प्रेरणादायी विचारांना माझा सलाम _/!\_ #HappyBirthdayKalam
© रामदास कराड
Thanks a lot for following my blog, Happy blogging.
LikeLiked by 1 person