आयुष्यात आपल्याला काय हवंय…? आपण कसे आणि नेमके कोठे असायला हवंय..? हे फारचं कमी वेळा कमी लोकांनाच कळतं.. पण ज्यांना हे वळतं तेच बदल घडवतात, जीवनात परिवर्तन तीच लोकं घडवून आणतात.. योग्य वेळी योग्य समज प्रत्येकालाच येतेच असं नाही राजेहो.. पण वेळीच आपण काय करतोय त्याचं आत्मपरीक्षण करायला हवं.. जागं व्हायला हवं, जागृत होऊन आपण वेळीच सावध व्हायला हवं.. वेळ हा खरंच कापरा सारखा असतो तो उनाडक्या करत कधी भुर्रर्रर्रर्रर्रकन उडून जातो तो खरंच कळत नाही मग पुन्हा हतबल नि हताश आपल्या हातीही काहीच उरत नाही, वयानं वाढलं तरी पोरपण जात नाही पण ते पोरपण सत्कर्मी लागलं पाहिजे हेही तितकंच खरं..
एखादी गोष्ट जर आपल्या हातीच नसेल तर त्याची खंत करू नये पण आपल्या हाती असूनही त्याचं महत्वं आपल्याला समजू नये हे फार वाईट. समजत नाहीच, अनेकांना अनेकदा सुचतही नाही सांगणारं, बोलणारंही कुणीच नसतं म्हणून कदाचित कळतही नाही आणि समजावून सांगणारं कुणी असेल तरी पण त्यावेळी त्याचं महत्व गांभिर्यानं जाणून घेण्याच्या मनस्थितीत आपणही नसतो. मग काय..? समज येते पण वेळ निघून गेलेली असते, त्या त्या वेळेस ज्या त्या गोष्टी आपल्याला करता, शिकता आल्या नाहीत यासाठीच स्वतःच मन कुरतडत बसतो आपण. तेही स्वतःच स्वतःला असंख्य दोष देत. आपल्याला कळलं नाही याची खंत माञ जिव्हारी लावून घेत आयुष्यभर मानत बोचत राहते वेदनेसारखी तीही अगदी कायमचीच..
राजेहो.. जीवन हे अखंड आहे, असतंही त्याचे भाग करता येत नाहीत की तुकडेही पाडता येत नाहीत, एखादं उद्दिष्ट निवडल्यानंतर आपल्याला पूर्णपणे त्या उद्दिष्टांचा पाठलाग करावा लागतो, त्याचसाठी स्वतःला झोकून द्यावं लागतं, त्या धेय्यासाठी जीवन अर्पावं लागतं मग त्यात इतर कोणत्याही अवास्तव गोष्टींचा विचार सुद्धा करून चालत नाही.. यश अपयश हा पुढचा प्रारब्धाचा भाग.. माणुस कितीही महत्वकांक्षी असला तरी परिस्थिती पुढे त्याला कधी ना कधी झुकावं लागतचं.. आयुष्य अशाच मार्गाने चालत असतं, नवनवीन वळणं घेत, काहीसं धक्के देत, भरपूर अनुभव देत धावत असतं, आयुष्यात सर्वच गोष्टींचा अनुभव आपण घेत बसलो तर आयुष्य संपून जाईल पण अनुभव संपणार नाहीत, अनुभवच यावा हे गरजेचं नाही, काही गोष्टी दुसऱ्याच्या अनुभवांवरून अनुमान काढून जाणायच्या असतात तर काहींच्या बाबतीत आपण एखाद्याच्या सांगण्या, बोलण्यावर विश्वास ठेवायचा असतो. अनुभवाने माणुस मोठा होतो ही गोष्ट कितीही जरी खरी असली तरी ती त्या निसटून गेलेल्या वेळीची उणीव कधीच भरून काढू शकत नाही..
आयुष्यातील कुठल्याही कठीण प्रसंगानंतर ‘असं का?’ पेक्षा ‘आता पुढे’ हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा कारण त्या प्रश्नात अनेक उत्तरं दडलेली असतात.. पण हे प्रश्न आपल्याला कधी कळतील जेंव्हा आपण सजग, जागृत आपण काय करतोय याचा विचार करत असू तेंव्हाच. गेलेली वेळ परतवून येत नाही ती फक्त आहे तशी स्विकारावी लागते पण कळूनही वाहत जाणं म्हणजे शुद्धमूर्खपणाचं लक्षण. वाया जात असलेला, गेलेला प्रत्येक क्षण हा अपयशाला कारणीभूत असतो राजेहो.. स्वस्थ बसणं अनेकदा माणसाला अस्वस्थ करतं अनुभवाने आपण शहाणे होतो खरं.. पण “उशिरा आलेलं, सुचलेलं शहाणपण हे अनेकदा फक्त नि फक्त शोकांतिकाच देत असतं.. राजेहो..”
“आपुलाच वाद आपल्याशी काय म्हणावं अश्या स्थितीला.. अनुभवांती व्यक्त होतोय.. राजेहो..”
©रामदास कराड
One thought on “उशिरा आलेलं शहाणपण…;”