आपल्या महाराष्ट्राच्या मातीत साधंपन आणि अगदी ठासून भरलेलं सच्चेपन आहे. देशासाठी शहीद झालेला ‛हुतात्मा शिवराम हरी राजगुरु’ यांची प्रतिमा आठवली की आजही देशासाठी महाराष्ट्राच्या मातीचा त्याग, आत्मबलिदान, शौर्याची आठवण करून होते. अवघ्या बावीस, तेवीस वर्षाच्या आत बाहेरचे हे पोरं त्याकाळात क्रांतिकारक म्हणून देशभर चळवळी गाजवत होते. देश ज्यावेळी पारतंत्र्यात होता त्यावेळी एका विचाराने जवळ आलेले हे तरुण देश गुलामगिरीतुन मुक्त व्हावा यासाठी लढा उभारत होते. शिवराम हरी राजगुरु उर्फ रघुनाथ हा आपल्याच महाराष्ट्राच्या मातीतला ‛मनाचा सच्चा, वृत्तीनं निर्भय, शब्दाचा पक्का, ‛लढवय्या वीर’ आपल्या पुणे जिल्ह्यातील खेडचा. जे खेड आज राजगुरु नगर म्हणून याचं हुतात्म्याच्या नावानं ओळखलं जातंय.
‛राजगुरु उर्फ रघुनाथ’ हे क्रांतिकारक चळवळीत सहभागी झाल्यापासून भगतसिंहांचे जिव्हाळ्याचे अन जिद्दीचे मिञ होते. जिद्दीचे यासाठी की ते भगतसिंहांना आपला प्रतिस्पर्धी समजायचे. जिथं तिथं त्यांच्याशी स्पर्धाच. राजगुरूंना एका चिंतेनं कायम ग्रासलेलं असत. ते म्हणजे ‛भगतसिंह’ माझ्या आधी या देशासाठी हुतात्मा होऊ नयेत. कारण मला भगतसिंहांच्या आधी मरायचं आहे. मीच भगतसिंहांच्या आधी जाणार म्हणून संघटनेच्या समोर राजगुरूंचा एकच हट्ट होता. प्रत्येक चळवळीत पहिली गोळी चालवण्याची परवानगी मला दयावी. मला आधी जायचं आहे. सॅडर्सवर पहिली गोळी राजगुरूंनीच चालवली होती.
जानेवारी १९३० मध्ये जेलप्रशासनाने शब्द फिरवल्याने जेलमध्ये दुसऱ्यांदा उपोषण चालू होतं. त्यावेळी राजगुरुही होते. ब्रिटिश पोलिसांना मारण्यात आणि त्यांचा मारखान्यात सर्वांच्या पुढं आणि उपोषणातही राजगुरु सर्वांच्या पुढचं असत. सर्व क्रांतिकारक जेवण काय साधं पाणी सुद्धा पीत नसत इतकं कठोर त्यांचं उपोषण चालू होतं. कोणत्याही परिस्थितीत त्यांचं उपोषण हे तोडलं गेलं पाहिजे हा प्रयत्न जेल प्रशासण करायचं. उपोषण सुरू होऊन १३ दिवस लोटले होते. हे निगरगट्ट ब्रिटिश सरकार क्रांतिकारकांचा एवढा निर्दयीपणे छळ करायचं, त्यांना मारहाण करून खाण्यासाठी तोंड उघडण्याचा प्रयत्न करायचं पण हे पोरं काही आपलं तोंड अन्न – पाण्यासाठी उघडत नसत.
तोंड उघडत नसल्याने त्यांच्या नाकात नळी घालून त्यात दूध ओतण्याचा अयशस्वी प्रयत्नही ते करायचे. सरकार मागण्या मान्य करेना आणि क्रांतिकारकही माघे हटत नव्हते. एकदा राजगुरूंच्या नाकात नळी सोडताना ती नळी नाकातून त्यांच्या फेफड्यात गेली. जबरदस्तीने वरून दूध ओतलं पण ते दुध फेफड्यात गेल्याने राजगुरूंना निमोनिया व इन्फेक्शन झालं, डॉक्टरांच्या रिपोर्टवरून राजगुरूंची तब्यत अत्यंत खालावली होती. राजगुरूंना दवाखान्यात नेण्यात आले. राजगुरु एका कागदाच्या चिट्टीवर लिहून शिव वर्मांना ती देतात त्यात ‛सफलता’! असं त्यांनी लिहलं होतं. एकाचा तरी बळी दिल्या शिवाय क्रांतिकारकांच्या मागण्या मान्य होणार नव्हत्या. त्या बलीवेदीवर पुढं आपण जात आहोत याचा राजगुरूंना आनंद वाटत होता. पहिल्या उपोषणात १३ सप्टेंबर १९२९ रोजी यतींद्रनाथ दास हे क्रांतिकारक असेच हुतात्मा झाले होते.
जेल पोलिस अधिकाऱ्यांनी सर्वांना दवाखान्यात आणलं. सेंट्रल जेलमधून भगतसिंह आणि बटूकेश्वर दत्त हे देखील तिथं आणले गेले होते. राजगुरु दिवसेंदिवस मरणाच्या दाढेकडे ओढत जाऊ लागले. क्रांतिकारकांची तब्यत खालावत होती. क्रांतिकारकांच्या उपोषणाचा समर्थनार्थ जेलच्या बाहेर जनतेचं आंदोलन उभं राहिलं होतं. तेवढ्यात सरकारने मागण्याही मान्य केल्याने उपोषण माघे घेण्याचे ठरले. भगतसिंह राजगुरूंचे उपोषण सोडण्यासाठी हातात दुधाचा ग्लास घेऊन आले आणि म्हणाले ‛आगे भागना चाहते हो बच्चु !’ तर राजगुरु म्हणतात ‛मी विचार केला होता की पुढं जाऊन तुझ्यासाठी एखादी खोली बुक करावी ! पण नौकराशिवाय तुला प्रवास करणं अशक्य आहे असं दिसतंय !’ यावर दोघेही हसले, राजगुरूंनी भगतसिंहांच्या हाताने दूध घेऊन उपोषण सोडलं..!
सॅडर्स मर्डर भगतसिंह, राजगुरु आणि आझाद यांनीच घडवून आणला होता. त्यावेळी लाहोर सोडताना पोशाख बदलून भगतसिंहांचा जो नौकर होता. तो शिवराम हरी राजगुरु उर्फ रघुनाथ हा होता. मित्रत्व निभावन्यात त्यांची स्पर्धा तर होतीच पण या आपल्या देशाच्या मातीसाठी लढत लढत भगतसिंहांच्या आधी मरण्याची इच्छाही होती. त्यांनी देशासाठी भोगल्यात एवढ्या यातना आणि कष्टं. काय पोरं होती ही पहा. आजची जगण्यातली स्पर्धा पाहून त्यांची देशासाठी मरण्याची स्पर्धा आठवते. हा ‛राजगुरु’ आपल्या महाराष्ट्राचा होता जो आज या देशाची, राष्ट्राची संपत्ती झाला आहे..!
संदर्भ – संस्मृतियां
#क्रांतिपर्व
#राष्ट्रप्रथम 🇮🇳
#इंकलाब_जिंदाबाद
#शहीद_दिवस_२३_मार्च
© रामदास कराड