उणंपुरं २३ वर्ष ५ महिने २५ दिवसांचं आयुष्य वाट्याला आलेलं, देशभक्तीच्या ध्येयाने भारलेलं. वयाच्या १५ व्या वर्षी घराचा उंबरा ओलांडला तो देशाच्या पायात बांधलेल्या बेड्या तोडण्यासाठी. उपाशीपोटी भटकंती, वनवण अन भ्रमंती स्वीकारली. क्रांतीची मशाल पेटवली. देश आणि देशबांधवांची गुलामगिरीच्या जोखडातून मुक्तीसाठी.
भगतसिंह लाला लजपतराय नॅशनल कॉलेज लाहोर येथे शिक्षण घेत होते त्यावेळी त्यांचे वडील किशनसिहांनी आपल्या वृद्ध आईच्या ईच्छेसाठी आईच्या डोळ्यासमोर भगतसिंहांनी लग्न करावे. असा हट्ट आपल्या मुलाकडे धरला होता. त्या आशयाचे पञ किशनसिंहांनी भगतसिंहांना पाठवलं पण भगतसिंहांना ते मान्य नव्हतं. कारण त्यांचं आधीच या देशाशी आणि देशाला स्वातंत्र्या मिळवून देणाऱ्या संघर्षाशी लग्न झालं होतं. स्वतःच्या लग्नाला नकार देणाऱ्या भगतसिंहांवर अत्यंत बालवयात देशभक्तीचा ज्वर किती चढलेला होता ते त्यांनी आपल्या वडीलांना लिहलेल्या पत्रातून अगदी सूर्यप्रकाशा एवढं स्वच्छ दिसून येतं. ते पत्रातून लिहतात ‘वृद्ध आईच्या हट्टासाठी तुम्ही माझे लग्न करू इच्छित आहात पण आपण ही गोष्ट विसरला आहात की भारतमातेची ३५ कोटी मुले आज दुःखात जगत आहेत’
जेंव्हा या लग्न नकाराच्या बाबतींत भगतसिंहांची समजुत काढण्यासाठी किशनसिंह लाहोरला येणार आहेत असं त्यांना समजले, तेंव्हा भगतसिंहांनी लाहोर तर सोडलं, त्याचबरोबर आपलं घरही देशासाठी सोडलं. ते कायमचंच. पण जाताना किशनसिंहासाठी खालील पञ ठेवले.
आदरणीय पिताजी,
नमस्ते..
मी माझे जीवन भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांच्या उच्च ध्येयासाठी अर्पण केले आहे. त्यामुळे आरामदायी व प्रापंचिक सुखांचे आकर्षन यांना माझ्या जीवनात काहीच स्थान नाही. तुम्हाला आठवत असेलच, की मी लहान होतो तेंव्हा आजोबांनी माझ्या मुंजीच्या वेळी जाहीर केले होते, की मला देशसेवेसाठी अर्पण करण्यात आले आहे. म्हणूनच मी त्यावेळची प्रतिज्ञा पूर्ण करत आहे. तुम्ही मला माफ कराल अशी आशा आहे..!
‛आपला आज्ञाधारक’
भगतसिंह
त्याच वेळी भगतसिंह लाहोर येथील आपल्या मित्रांना सांगतात की ‛गुलाम भारतात जर आपले लग्न झाले तर मृत्यू हीच आपली वधु असेल’ घरात एक विधवा आहे आणि एक काका फरारी आहेत, घरात आणखी एक विधवा नको, एका तरुण मुलीचं आयुष्य मी खराब करणार नाही.. (या वेळी भगतसिंह यांचे वय १५ वर्ष होतें)
भगतसिंहांची आपल्या ध्येयाप्रती, देशाप्रती किती निस्सीम निष्ठा होती. तेही किती कमी वयात ते या पत्रातून स्पष्ट होतं. एखाद्या मुलीचं आयुष्य आपल्यामुळं खराब होऊ नये हा उच्च कोटीचा त्यांचा अत्यंत कमी वयातील विचार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं सर्वोच्चं दर्शन घडवतो. असे दैदीप्यमान विचार, उच्च आदर्श आणि उदात्त हेतू असणारे देशासाठी सर्वस्व त्याग करत हसत हसत मृत्यूला अलिंगन देणाऱ्या ध्येयधुरंधर देशभक्त भगतसिंहंसारख्या शूरवीरांचे नित्य स्मरण होत राहणं हीच आजच्या काळातील तरुणांची खरी जवाबदारी आहे, नव्हेतर ते कर्तव्य आहे म्हणूनच हा लेख प्रपंच..
संदर्भ – शहीद भगतसिंह समग्र वाड्मय
#क्रांतीपर्व
#शहीददिवस २३ मार्च १९३१ – २०१८
#राष्ट्रप्रथम🇮🇳
#इंकलाबजिंदाबाद
© रामदास कराड