मावळतीचा लालबुंद सूर्य अथांग पसरलेल्या सागरात विसर्जित होताना पाहिलं की तुझ्या गहिऱ्या, पाणीदार डोळ्यांची आठवण येते.. असूनही नसलेली तू अन क्षणभर नेत्रसुख देणारं त्या तप्त सूर्य गोळ्याचं पाण्यातील प्रतिबिंब मग कुठल्यातरी जुनाट विचारांना चालना देत राहतं !
कसलाही गोंगाट न करता अगदी शांतपणे आपल्या घराकडे परतणारे पक्ष्यांचे थवे बघितले की आठवतं ते तुझं माझ्याकडे शेवटचं वळून पाहणं डोळे मोठ्ठे करून नजरेनचं उत्तर देत तुझं ते बोलणं, एका प्रवासाची सांगता आणि मनापासून घेतलेला तो निरोप अन पंखाना विश्राम देऊन नवीन भरारी घेण्याची ती तुझी धमक !
क्षितीजा पल्याड विसावलेल्या दिवाकरा प्रमाणे हळू हळू तुझ्या आठवणी देखील आता विसावत चालल्या आहेत पण कधी तरी मग असंच अधून मधून मनात अचानक आठवणीचं उधाण उठतं, समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा किनाऱ्याला बिलगून जश्या परतून जातात ना अगदी तश्याच.. उरलेल्या तुझ्या शेवटच्या आठवणीत आजही दिवस सरतात पण मनातलं काहूर क्षमवायला खरंच बरीच कसरत करावी लागते !
कुठल्याही दिशेचा मान आणि मर्यादा न राखणारा गार वारा येऊन जेंव्हा अंगाशी भिडतो ना.. तेंव्हा आठवतं तुझं ते चोरटा कटाक्ष टाकून हळूचं पाहणं अन गालातल्या गालात निखळ पण खळखळून हसत राहणं मग उफाळून येतात मनात माझ्या त्या बेभान झालेल्या भावनांच्या समुद्री लाटा अन त्या खळाळनाऱ्या लाटांचा आवाज अनादी अनंताच्या पलीकडे जाऊन पोहोचलेला असतो !
© रामदास कराड ✍️