निद्रेचा अन् त्याचा अश्यात सावतासुभा चाललेला. अनेकदा कूस बदलूनही त्याचे प्रयत्न निष्फळ ठरायचे. मनाला लागलेली हुरहूर निद्रेशी जवळीक होऊ देत नव्हती. कितीतरी रात्री त्याने या काळात जागून काढलेल्या. त्याचं मन कशातच रमत नव्हतं. लोकांच्या गर्दीत असूनही तो एकटाच हरवलेला होता.
नेहमी उशिरा झोपून उशिराच जागणारा तो सुर्योदय होण्याआधीच आता जागा व्हायचा. अपरात्रीपर्यंत जागलेले त्याचे डोळे, पहाटे लवकर जागे झालेले भाव त्याच्या चिंताक्रांत डोळ्यातून चेहऱ्यावर उमटलेले स्पष्ट दिसायचे. नेहमी हस्यकल्लोळात सामील असणारा तो एकटाच एकांतात असायचा.
आजवर आपल्या कोषात जगलेला, स्वतःच्या कुंपणाबाहेर याआधी तो कधीही नव्हता गेला. आयुष्यातील अनेक निर्णयाचे पावलं त्याने विचारपूर्वकच टाकलेले. हा नवा नियतीचा खेळ त्याला निराळा होता. कधीच कुठेच न गुंतलेला तो इथं मात्र मनातून गुंतला होता.
तिच्या आठवणीने तो मनातून व्याकुळ झालेला. राहून राहून भिंती अडून तिने त्याच्याकडे पाहून टाकलेला एक चोरटा कटाक्ष त्याच्या व्याकुळतेत अधिक भर घालत होता. तिच्या नजरेनं केलेला घाव पार आरपार त्याच्या मनात झाला होता. नेहमी तिचा तो निरागस, निष्पाप, निर्मळ चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येऊन उभा राहायचा.
तो तिच्या एका नजरेनं घायाळ झाला होता.. तो प्रेमात पडलाय तिच्या..
© रामदास कराड