…..मग आपला डावा हात मिशांवर नेत आझादांनी मिशांवर ताव मारला !

चित्रांशी आठवणी जुडलेल्या असतात. काळ कितीही पुढे वाहिला तरी त्याला आठवणीत बांधून ठेवण्याचं कसब माञ छायाचित्रात आहे. छायाचित्र आठवणी असतात. निघून गेलेल्या क्षणांची साक्ष असतात. अनेकांची छायाचित्रे आजही कित्येकांनी जपून ठेवली आहेत. आठवणी म्हणून.

कित्येक जुन्या – पुराण्या तसबिरी तर आजही इतिहासाची अन् त्यातील रोमहर्षक प्रसंगांची आठवण करून देतात. आपल्या आयुष्याला आकार देण्यासाठी येणाऱ्या भावी पिढ्यांना मार्गदर्शक, स्फूर्ती, प्रेरणा देणाऱ्या त्या स्मृतींची आजही कायमच दखल घ्यावी लागतेच हे विशेष !

क्रांतीचा किस्सा व्यक्त करावा म्हणून बऱ्याच दिवसांनी या आवडीच्या विषयावर थोडा आज लिहता झालो. आपल्या पिळदार शरिरष्टीवर शोभणार्या आणि पाहणाऱ्याला रुबाबदार वाटणाऱ्या चेहऱ्यावर उठून दिसणाऱ्या मिशांवर ताव मारलेलं छायाचित्र दृष्टीस पडलं आणि त्यांच्या चित्राशी संबंधित असणारी पुस्तकांत वाचलेली एक आठवण मनात ताजी झाली.

अगदी लहान वयात भोगाव्या लागणारे कष्ट, हालअपेष्टांशी केलेला सामना यांत त्यांच्या मनाची सिद्धाता किती थोर होती, याचा प्रत्यय आझादांच्या व्यक्तीमत्वातुन आल्या शिवाय राहत नाही. गुलामगिरीच्या जोखडातून देशाला मुक्त करण्याच्या उलाढाली चालू असताना क्रांतिकारकांचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या एका अद्वितीय महापुरुषाचा जीवनक्रम अनेक घटनांनी भारलेला आणि भरलेला होता. त्या प्रख्यात पुरुषाचे नाव चंद्रशेखर आझाद !

पोटाची खळगी भरण्यासाठी ही क्रांतीची उलाढाल नव्हती तर किमान येणाऱ्या पिढ्यांच्या भाग्यात तरी स्वातंत्र्याची सुंदर पहाट पाहायला असावी हा अट्टाहास होता. ही क्रांतीची कहाणी मोठी रंजक आहे, अनेक हस्यांचे फवारे यात आहेत, दिलदार मैत्रीचे किस्से तर अफाट आहेत तसेच दुःख, दुरावा, संकट, यातनांचे अघटित अनुभवही फार आहेत. क्रांतीची वाटच तशी काटेरी होती.

मास्टर रुद्रनारायण सरस्वती पाठशाळेत चित्रकलेचे शिक्षक होते. ते उत्तम छायाचित्रकार आणि मूर्तिकारही होते पण त्याच बरोबर डबलबार, कुस्ती, मलखांब सारख्या शारीरिक व्यायामाचं कसबही त्यांच्या अंगी आगदी ठासून भरलेलं होतं. काकोरी कटानंतर फरारीत १९२६ मध्ये आझाद झांशीला आले होते. त्यावेळी ते मास्टर रुद्रनारायण यांच्याकडेच राहू लागले. आझाद झांशीत नाव आणि पेशा बदलून राहत असत. तिथं त्यांचं नाव हरीशंकर आणि पेशा मोटर मेकॅनिक असा होता. रुद्रनारायण स्वतः राष्ट्रीय आंदोलनात तुरुंगवास भोगून आलेले, चळवळीतलेच सहकारी.

बहुतेक क्रांतिकारक आपले छायाचित्र कुणाला काढू देत नसत. त्याचं कारण असं की पोलिसांना ओळख पटविण्यासाठी ते चित्र पुढे उपयोगी पडण्याचा दाट संभव असे. आझादांचाही तोच कटाक्ष होता. पण प्रभाव पाडणाऱ्या आझादांच्या व्यक्तिमत्त्वाने रुद्रनारायण यांच्याशी प्रेमाचे संबंध प्रस्थापित झालेले, त्या दोघांची चांगली गट्टीच जमली होती.

एकवेळ त्यांच्याकडे अंघोळ आटोपून आझाद बाहेर आले, तेंव्हा रुद्रनारायण हातात कॅमेरा घेऊन उभे होते. ते आझादांना म्हणाले, अरे, आज तू तुझा फोटो मला काढू दे ना..? अत्यंत बेसावध आसवस्थेत आझादांनी हो भरलं. पण ते पुढे रुद्रनारायण यांना म्हणाले की मला माझ्या मिशा तरी नीट करू द्या, मग आपला डावा हात मिशांवर नेत आझादांनी मिशांवर ताव मारला, तोच दुसऱ्याच क्षणी रुद्रनारायण यांनी ते भारदस्त व्यक्तीचं चित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं.

( टीप – सदरील छायाचित्रामुळे ही गोष्ट आठवली. मूळ छायाचित्र हे नाही ! )

पुढे कानपुरला गेल्यानंतर त्या चित्राची आझादांना आठवण झाली. त्यावेळी तेथील सहकारी विश्वनाथ वैशंपायनांना सांगितले, की रुद्रनारायण यांच्याकडे जाऊन ते काचेच्या फ्रेममध्ये लावलेलं चित्र फोडून, फाडून टाक. वैशंपायन त्यासाठी तिथं गेले देखील पण रुद्रनारायण म्हणाले की तुमच्यासमोर ते चित्र मी भिंतीत लिपुन टाकतो, तुम्ही आझादांना जाऊन सांगा की चित्र नाहीसं केलं आहे, म्हणजे तुम्ही त्यांची आज्ञा पाळली असं होईल. हे चित्र आपण आठवण म्हणून ठेवू नाहीतर यांच्यासाठी आपण पुढे कधी रडत बसू !

विश्वनाथ वैशंपायन यांना रुद्रनारायण म्हणाले ती गोष्ट पटली होती. कारण त्या माघे इतिहासावरील दृष्टीला दिलेली धीटसाथ होती. मास्टर रुद्रनारायण आणि वैशंपायन यांची दूरदृष्टी होती. भावी काळासाठी ही चित्र सुरक्षित राहिली पाहिजेत हा विचार त्या माघे होता. येणाऱ्या पिढ्यांना क्रांतीची प्रेरणा देणारं ते छायाचित्र होतं. क्रांतीच्या खाणा-खुणा सांगणाऱ्या एका विराची ती एक स्मृती होती. ज्या जिवाच्या जोखमेनं मास्टर रुद्रनारायण आणि वैशंपायन सारख्यांनी सांभाळली आणि आज आपल्या पर्यंत पोहचती केली. ज्यांना पाहून आपण आज प्रेरणा, स्फूर्ती घेतो. त्यांच्या त्या छायाचित्राचा असाही एक इतिहास आहे. तो आज त्यांच्या स्मृतीदिनी आठवला म्हणून शब्दांतुन आझादांना नमन करीत लिहीता झालो.

आझादांचं व्यक्तिमत्व शब्दांत अधोरेखित करणं कठीण. पण हा मनात उसळलेला क्रांतिकल्लोळ इथं रेखाटण्याचा एकमेव हेतू हाच की आझादांसारख्या आणि अश्याच अलौकिक पुरुषांच्या खांद्यावरच त्यावेळच्या हिंदुस्थानची, आजच्या भारताची कमान दिमाखात खडी होती. जी आजही आहे.

क्रांतीच्या लढ्यात सामील असलेल्या अनेक वीरपुरुषांची एक माळ होती. हिंदुस्तानच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत एकसंघ पसरलेली. अनेक सहकारी साथीदार या लढयात सहवासात सोबती झालेले सहकारी मिञ होते. हिंदुस्थानातील प्रत्येक राज्याच्या माती – माणसाशी संबंध आलेली ही माणसं आपल्या मातीच्या – महतीसाठी छातीला माती लावून शेवटपर्यंत अविरत लढत राहिले. होयऽऽ शेवटच्या श्वासापर्यंत.. आयुष्याच्या अखेरपर्यंत..

जब तक जिया तब तक मुछोंपें ताव था..
गुलाम देश मे वो इकलौता आझाद था..

  • संदर्भ – वडवानल – लेखक वि.श्री.जोशी

राष्ट्रप्रथम 🇮🇳

आझाद

इंकलाब_जिंदाबाद

© रामदास कराड

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: