राजाची राज्य कारभारावरची देखरेख सैल झाली तर राजाच्या देखरेखीखाली राज्य कारभार करणाऱ्या कारभाऱ्यांच्या एकाधिकारशाहीचा स्तोम माजतो. यातून अधिकार अधिक दुणावतो. मग स्वअस्तित्व टिकवण्यासाठी अश्याच भेदयांची साखळी तयार केली जाते. परिणामी राजा नव्हे राज्याचा कारभार कारभारीच करू लागतात..
राजाच्या डोळ्याच्या पलीकडेच पुन्हा प्रकरणांचा निपटारा होऊ लागतो. मग राज्याची ख्यालखुशाली कारभाऱ्याच्या तोंडून ऐकायची सवय राजाला लागते. यातून रयतेचे हाल होतात, त्यांच्याकडे राजाचं दुर्लक्ष होतं, त्यातून असंतोष माजतो मग परिणामी पुढे हळू हळू राजाचं राज्यही लयाला यायला लागतं..
राज्याची घडी विस्कळीत होऊ लागली की राजाचे डोळेही उघडू लागतात, जिकरीचा वक्ताला सोबती असलेले आठवू लागतात पण ते राजाने दुर्लक्षित केल्याने आणि कारभाऱ्यांकडून मनातून दुरावलेले अन् दुखावलेले असतात, मग राजाला कळतं पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय आणि बराच उशीर झालाय..
आणि जेंव्हा सुस्तवाल राजाच्या राज्यात मस्तवाल कारभाऱ्यांचा कारभार वाढला आहे, तेंव्हा प्रजा दुर्लक्षित झाली. मग परिणामी पुढे गर्दन छाटली गेली ती राजाचीच राज्य कारभार करणाऱ्या कारभाऱ्यांची नव्हे.. पण हे सारं घडतं कशाने..? राजाचं राज्यावरचं लक्ष कमी झाल्याने..
इतिहास नेहमीच खूप काही शिकवतो, इतिहास नेहमीच खूप खोलवर अर्थ सांगत असतो, ‘विजयाच्या उन्मादात आणि पराभवाच्या निराशेत बऱ्याचदा चुकीच्या व्यक्तीचे उदात्तीकरण होते, हा इतिहास आहे. आणि त्या व्यक्तीचे स्तोम माजल्यानेच पुढचा इतिहासही ‘बि’घडवतो..
हे सारं टाळण्यासाठी राज्याची सूत्रे राजाच्या हातात आणि राजाची राज्यावर अन् राज्य कारभारावर करडी नजर असावी लागते, तरंच परिणामी पुढे राज्याचा गाडा सुस्थितीत आणि व्यवस्थित चालतो नाहीतर ‘कोणतीही सत्ता उन्मत झाली की तिचा नाश होणं हा अटळ असतो’ हा इतिहास आहे !
#कथा_ऐतिहासिक_काल्पनिक
©रामदास कराड