कोरोनाच्या परिस्थितीत लोकडाऊनमुळे गेल्या दीड-दोन महिन्यात फार मोठं नुकसान झालंय. खूप साऱ्या गोष्टी थांबल्यात. व्यवसाय – व्यवस्था थांबलीये. कामधंदा, रोजगार बंदय. असंख्य गोष्टी न भरून येणाऱ्या आहेत. कुणाच्या परीक्षा खोळंबल्यात तर कुणी विद्यार्थी मिञ या लोकडाऊन मध्ये सारं काही ठप्प असताना घरी बसून उत्तीर्ण झालेले ऐकायला मिळत आहेत, कुठल्याही गोष्टीचे फायदे तेवढेच तोटे या उक्तीप्रमाणे ही कसर कुठे ना कुठे आणि कधी ना कधी भरून निघेलच पण समाधान मानलं, मान्य केलं तर..
पण वेगाने धावणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एवढा एक पॉज हवा होता असं नेहमीच राहून राहून मला वाटत राहायचं. या कोरोनाच्या कठीण काळात प्रत्येकजण एकाठिकाणी येऊन आपल्या माणसांत स्थिरावलाय. अगदी ब्लॅंक माईंडने. एकदम निवांत. कुठल्याही गोष्टीची तकतक न करता. आणि कुठल्याही महत्वाच्या कामाचे महत्त्व शून्य या काळात या एका पॉजने केलंय. हे माञ नक्कीय.
आपल्याकडे 7 जूनला अथवा त्या नंतर पावसाला सुरवात होते. आणि दर 4/5 वर्षाला दुष्काळ पडतो. असं आजवरचं आपल्या महाराष्ट्राचं या थोड्याफार प्रमाणातलं चित्रं आहे. आणि मार्च – एप्रिल सपंत नाही त्याआधीच पिण्याच्या पाण्यासाठी वणवण चाललेली आपण अनुभवायतो. प्रत्येकजण.
असं कुठंतरी माध्यमातून मी ऐकलंय की दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्या पृथ्वीवरची पहिल्यांदाच हवा येवढी शुद्ध झालीये. निसर्गात बदल झालाय, सगळं रिसायकल झालंय. निसर्गाची प्रक्रिया पूर्वपदावर आलीये. हे न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातम्यांतुन आपल्या सर्वांनाच ऐकायला मिळालंय.
खरंतर ही प्रकियापूर्ण होण्यासाठी एक कुठला तरी पॉज हवा होताच. पण असा माणसाचा बळी जाण्याच्या भीतीचा पॉज नसायला हवा होता. इतकंच. सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. नुकसान कधीच न भरून येणारं आहे. पण एक नवा बदल आपण आपल्या आयुष्यात अनुभवतोय हे देखील खूप महत्त्वाचं आहे. पण जर आपण सर्वांनीच याला सकारात्मक घेतलं तरच.
मान्य… पुढे असंख्य यक्ष प्रश्न उभे आहेत. असतील. पण आपण जगलो तरच त्या प्रश्नांची उत्तरं आपण सोडवू आणि शोधू. त्यामूळे आपल्याला यावेळी थांबणं आवश्यक होतं. आहे. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, निश्चित येईलही. ती येवो. ती यायलाच हवीये.

पण या सगळ्यातून एक नक्कीच लक्षात आलं असेलच. कदाचित प्रत्येकाच्याच. की 7 जूनच्या आधीच या दिवसांत पावसाच्या धारा धरणीवर कोसळायला सुरवात झालीये. निसर्गाच्या प्रक्रियेतला मानवी हस्तक्षेप थांबला की निसर्ग कशी नवी लकाकी घेऊन बाहेर पडतो. नव्या नवलाईनं. मानवसृष्टीवर भरभरून उधळण करतो. तेही वेळेआधी… वेळेबरोबर…
पाऊस🌧
PositiveVibes
© रामदास कराड