मनात आठवणींचा आज पसारा आहे. आज सहज आपल्या शाळेकडे जाणं झालं. शाळेसमोर काही काळ थांबलो देखील. शाळेच्या भिंतीवरचा रंग पार उडालेला दिसला. पहावं असं नव्हतं वाटत आज शाळेकडे. किती काळ लोटून गेलाय नाही. शाळा सोडून. शाळा किती गजबलेली असायची आपल्यावेळी. आज पार पोरकी झाल्यासारखीच भासली बिचारी.
शाळेच्या त्या मोकळ्या प्रांगणात एका रांगेत आपण झाडं लावली होती. वेगवेगळी. तेवढीच माञ आज तग धरून दिसली, हिरवीगार, गजबजलेली, पानाफुलांनी लगडलेली. तुला आठवतंय..? तू मुद्दाम वृक्षारोपणाचा आग्रह केला होतास त्यावेळी. आज ती बहरलेली झाडं पाहून तुझी आठवण मनात फार आली.
आपण शाळा सोडून जाऊ त्यावेळी आपली आठवण म्हणून आपण या शाळेत काहीतरी मागे ठेवून जाऊ, म्हणून त्या झाडांचा तुझा आग्रह होता. आपण उद्या इथं नसू पण ही झाडं, आपण इथं वाढलो, शिकलो, वावरलो, खूप खेळलो, बागडलो, अनेकदा चुकलोही आणि सावरलो देखील इथंच याची कायम साक्ष देत राहतील, असं तू त्यावेळी म्हणाली होतीस.
त्या झाडांच्या सावलीला आज अनेकजण विसावतात, आस – पास राहणाऱ्या अनेक लोकांची तिथं वर्दळ असते. लहानमुले त्या झाडांच्या सावलीला नेहमी खेळतात, ती तू प्रेमाने लावलेल्या झाडांबद्दल तुझी किती दूरदृष्टी होती हे आजचं दृष्य पाहून खरं वाटतंय. झाडांसाठीचा तुझा आग्रह खरंच किती खरा होता याची आज जाणीव होतेय.
शाळा सोडून खूप काळ झालाय आपल्याला. आपण मोठे झालो, वाढलो. आपापल्या मार्गाने पुढे गेलो. ती झाडंही आता फार मोठी झाली आहेत. पार उंच झाली आहेत, डेरेदार झाली आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत थंडगार सावली देतील इतके विशाल वाढली आहेत, तू लावलेली झाडं. आपण आज शाळेत नाही आहोत. पण ती झाडं तिथं शिकणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी आश्रय देतात. आजही.
पण एक तुला सांगू..? तो झाडांचा सळसळणारा आवाज आज मला काही सांगत होता. काही प्रश्नही कदाचित तो विचारत होता. खूप दिवस झाले त्यांना तू पाहायला आलीच नाहीस. त्यांना पाहायला येऽऽ.. त्यांना बोलायला येऽऽ.. त्यांच्या मनात आनादी काळापासून काही निरुत्तरीत प्रश्न आहेत ते ऐकून घ्यायला येऽऽ..
मी खूप प्रयत्न केला गं.. त्यांना विचारण्याचा. माझ्या जवळ तुझ्या बद्दल बोलतं करण्याचा. पण तू प्रेमाने लावलेल्या त्या झाडांचा फक्त तुझ्या जवळच व्यक्त होण्याचा हट्ट आहे, ती झाडं तुझी वाट पाहतायत. आजही. अगदी चातकासारखी.. होयऽऽ अगदी माझ्यासारखीच.. किमान त्या झाडांचा प्रेमाचा हट्ट पुरवण्यासाठी तरी येऽऽ..
© रामदास कराड